बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जुलै 2021 (08:10 IST)

कंपन्यांचे पत्रे उचकटून होणाऱ्या चोऱ्या ठरताहेत उद्योजकांची डोकेदुखी

लॉकडाऊनच्या काळात अनेक कंपन्यांनी आपले उत्पादन बंद ठेवले आहे.वीजबिल, कामगारांचे पगार, विविध कर यांच्या ओझ्याखाली लघु उद्योजक दबून गेला आहे. त्यातच कंपन्यांचे पत्रे उचकटून केल्या जाणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटना लघु उद्योजकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
 
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाने अनेक निर्बंध लावले आहेत.त्यामुळे उद्योगांच्या उत्पादकतेवर त्याचा परिणाम झाला आहे.चिखली परिसरात अनेक लघुद्योग आहेत.शहरातील तसेच शहराच्या बाहेर असणाऱ्या मोठ्या कंपन्यांना माल पुरविण्याचे काम चिखली आणि परिसरातील लघुद्योग करीत आहेत. कोरोना काळात मोठ्या उद्योगांनी कात टाकल्याने त्याचा थेट प्रभाव लघुद्योगांवर पडला आहे. मागील काही कालावधीत लघुद्योगांना कामाच्या ऑर्डर कमी झाल्या. त्यात वीजबिल,कामगारांचे पगार,इतर कर, कंपनीचा मेंटेनन्स या सर्व खर्चामुळे उद्योजक वर्ग मेटाकुटीला आला आहे. अनेकांनी आपले उत्पादन देखील थांबवले आहे. 
 
बहुतांश कंपन्यांचे बांधकाम हे पत्र्याचे असते. कमी जागेत व्यवसाय सुरू करायचा असल्याने सुरक्षा भिंत अथवा तारेचे कंपाउंड न करता थेट संपूर्ण जागेत मोठे शेड मारले जाते.याचाच चोरटे गैरफायदा घेतात. थेट पत्रा कापून उचकटायचा आणि कंपनीतून मिळेल तो माल चोरायचा असा सपाटा चोरट्यांनी लावला आहे.
 
चिखली परिसरात मागील सहा महिन्यांच्या कालावधीत पत्रे उचकटून चोरीच्या पाच घटना घडल्या आहेत. सुरक्षा साधनांची अपुरी व्यवस्था असल्याने चोरट्यांचा थांगपत्ता लागत नाही. पोलिसात याप्रकरणी गुन्हे दाखल केले तरीही चोरट्यांनी फारसा फरक पडत नाही. रात्रीच्या वेळी असे चोरीचे प्रकार केले जात आहेत.
 
चिखली परिसरात मागील सात महिन्यांच्या कालावधीत उघडकीस आलेल्या चोरीच्या घटना –
 
# सोनवणे वस्ती, चिखली येथे 26 फेब्रुवारी रोजी राज फासनर्स नावाच्या कंपनीत एक चोरीची घटना उघडकीस आली. कंपनी आणि ऑफिसचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्यांनी 16 एम एस वायर बंडल, एक डेल कंपनीचा लॅपटॉप, एक लॅपटॉप बॅग, चार्जर, सोनी कंपनीचा टीव्ही, सिम्फनी कंपनीचा एअर कुलर, हिक व्हिजन कंपनीचा आठ सीए डीव्हीआर, हार्ड डिस्क, एचडीडी टीव्ही, 100 किलो नट बोल्ट असा एकूण दोन लाख 78 हजार रुपये किमतीचा माल चरून नेला.
 
# 28 मार्च रोजी पहाटे तीन ते सकाळी नऊ या कालावधीत तळवडे येथील नेस इंडिया इंजिनिअर्स कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी 57 हजारांचे साहित्य चोरून नेले.
 
# 24 एप्रिल रोजी देहू-चिखली रोडवरतळवडे येथे भारत वजन काट्यासमोरजी टेक इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीत एक चोरीची घटना उघडकीस आली.अज्ञात चोरट्यांनी कंपनीचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला.कंपनीमधून 93 हजारांचा माल चोरट्यांनी चोरून नेला.
 
# 16 जून रोजी शेलारवस्ती चिखली येथे श्रेया इंटरप्राईजेस नावाच्या कंपनीच्या गोडाऊनचे पत्रे उचकटून चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला.अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे पत्र्याचे गेट समोरील बाजूने उचकटले.त्यावाटे आत प्रवेश करून सहा हजार 801 किलो वजनाचे स्टेनलेस स्टीलचे 17 लाख 67 हजार 477 रुपये किमतीचे बार चोरून नेले.
 
# 12 जुलै रोजी शेलारवस्ती, चिखली येथील ऍक्योरेट ऑटोमेशन अँड पॅकेजिंग सिस्टीम या कंपनीत आणखी एक घटना उघडकीस आली.कंपनीचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी सात लाख 48 हजार रुपयांचा गिअर बॉक्स, गेअर व्हील,गेअर शाफ्ट आणि इतर माल चोरून नेला.