रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (21:31 IST)

‘विधानसभा अध्यक्षांची निवड करा,’ दोन्ही काँग्रेस, भाजप, राज्यपाल आग्रही, शिवसेना मात्र शांत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहीलंय. भाजप नेत्यांनी केलेल्या तीन मागण्यांबाबत यथोचित निर्णय घ्या, अशी सूचना राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात केली आहे. पुढच्या आठवड्यात राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन होतंय. कोरोनासंसर्गाच्या भीतीमुळे हे अधिवेशन दोन दिवसांचं ठेवण्यात आलंय. त्यावरून, भाजप आणि महाविकास आघाडी सरकार आमने-सामने आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल कोश्यारी याआधी एकमेकांसमोर उभे ठाकलेले पाहायला मिळाले आहेत. राज्यपालांच्या पत्राला उद्धव ठाकरे यांनी अद्याप उत्तर दिलेलं नाही.
 
भाजपने उपस्थित केलेले तीन मुद्दे कोणते?
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यातील महत्त्वाच्या मुद्दयांवर राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, असं निवेदन भाजप नेत्यांनी दिलं होतं. भाजपने मांडलेले मुद्दे
 
राज्य विधिमंडळाचं अधिवेशन अधिक कालावधीसाठी घेण्यात यावं.
विधानसभा अध्यक्षांचं पद तातडीने भरावं.
ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत.
कोरोनासंसर्ग पसरण्याची भीती असल्याचं कारण सांगत महाविकास आघाडी सरकारने पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचं केलंय. भाजपने दोन दिवसीय अधिवेशनाचा विरोध केलाय. "महाराष्ट्राच्या अनेक महत्त्वाच्या मुद्दयांवर चर्चा होत नाही. सरकार पळ काढण्याचा प्रयत्न करतंय," असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी केला होता.
 
ते म्हणाले होते, "कोरोनामुळे अधिवेशन घेण्याची या सरकारची मानसिकता नाही. शेतकरी, कायदा-सुव्यवस्था अनेक प्रश्न आहेत. मराठा आरक्षणासाठी अधिवेशनाची मागणी होत असताना सरकार, पावसाळी अधिवेशनही घेत नाही."
 
विधानसभा अध्यक्षांची निवड
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिक्त झालंय. त्यानंतर सरकारने नवीन विधानसभा अध्यक्षांची निवड केलेली नाही. हा मुद्दाही भाजपने राज्यपालांपुढे उपस्थित केलाय.
अध्यक्षपदावरुन काँग्रेसमध्येच मतभेद आहेत. संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत असलं तरी, अनेक नेते अध्यक्षपदासाठी प्रयत्न करत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासुद्धा नावाची त्यासासाठी चर्चा सुरू आहे.
 
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात होईल असं काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच काँग्रेसचाच अध्यक्ष होईल असा दावा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीसुद्धा याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचं सांगितलं आहे.
 
शिवसेनेकडून मात्र यामुद्द्यावर सावध प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
 
"विधानसभा अधिवेशन फक्त दोनच दिवसांचं आहे, त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी उद्धव  ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील," अशी सावध प्रतिक्रिया शिवसेनेटे मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत यांनी दिली आहे.