1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जून 2019 (08:58 IST)

दूध पिशवीची 50 पैसे रक्कम रोज परत केली जाणार

राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय यशस्वीपणे राबवण्यात येत असून त्यात आणखी सुधारणा व्हावी म्हणून उपाययोजना आखण्यात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संपूर्ण राज्यात दिवसाला २३,७०२ मेट्रिक टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो, त्यातील १२,५४८ मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, त्यापुढे त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर करून शेतकऱ्यांना कमी दरात विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत दिली.
 
रिकाम्या दूध पिशवांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेण्यात आली असून सर्व दूध उत्पादक संघटना आणि संस्थांना विश्वासात घेण्यात आले आहे. रोज एक कोटी दूध पिशव्या रस्त्यावर पडतात, यापुढे दूध विक्रेत्यांकडे दूध पिशवी घेताना 50 पैसे डिपॉझिट ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी दूध पिशवी रिकामी झालेली परत करावी, ती स्वीकारून त्या दूध पिशवीची 50 पैसे रक्कम रोज परत केली जाईल, अशी योजना एक महिन्याच्या आत आमलात आणली जाणार आहे, अशी माहितीही कदम यांनी यावेळी सभागृहात दिली. असे केल्याने दिवसाला 31 टन दूध पिशव्यांचा घनकचरा कमी होईल, असे ते यावेळी म्हणाले.