शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (21:49 IST)

अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात जिलेटिन कांड्या सापडल्या, दोघांना पकडले

अमरावती जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात जिलेटिन कांड्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. अमरावती तिवसा येथील पंचवटी चौकातून गुरुवारी पहाटे ३ च्यासुमारास ही स्फोटक ताब्यात घेण्यात आली आहेत. तिवसा परिसरात काही तरुण जिलेटिन व स्फोटक नेत असल्याची माहिती तिवसा पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शहारात नाकाबंदी सुरु केली.
 
या नाकाबंदी दरम्यान २ युवक मोटरसायकलने जिलेटिन आणि स्फोटक नेत असल्याचा संशय आला. यावेळी या तरुणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी या तरुणांचा पाठलाग करत ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून २०० जिलेटिन आणि २०० नॉक डिटोनेरच्या कांड्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व तिवसा पोलिसांनी सखोल चौकशी केली आहे.
 
या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून या स्फोटकामागे मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एवढ्या मोठ्य़ा प्रमाणात स्फोटकांचा साठा हे तरुण कुठे घेऊन जात होते? याचा वापर कशासाठी होणार होता अशा अनेक गोष्टींचा तपास आता सुरु झाला आहे.