भ्रष्टाचार पचवता यावा म्हणून युती : नारायण राणे
शिवसेना नितिमत्ता नसलेला पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेला एकही शब्द खरा करुन दाखविला नाही. शिवसेना बोलेल तसा वागेल असा पक्ष नाही. मुंबई महानगरपालिकेत सर्वात जास्त भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार पचवता यावा, यासाठीच शिवसेनेने भाजपसोबत युती केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर केला आहे. आता नारायण राणे यांनीही पत्रकारपरिषद घेऊन शिवसेनेवर निशाणा साधला.
‘‘युती सडली होती तर मग पुन्हा एकत्र का आला?’’ असा प्रश्न उपस्थित करत स्वबळावर लढण्यास तयार झालेल्या इच्छुक नेत्यांनी आता काय करायचे? असा प्रश्न राणे यांनी यावेळी उपस्थित केला. राणे म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे यांनी आधी स्वबळावर लढण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना कामालाही लागण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानुसार स्वबळावर लढण्यास तयार झालेल्या उमेदवांनी आता ऐनवेळी काय करायचे? तसेच स्वबळाची भाषा करणाऱ्या संजय राऊत यांनी स्वत:ची फजिती करुन घेतली आहे, अशी टीका राणे यांनी केली.