आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीचा २४ फेब्रुवारी २०२२ ला यात्रोत्सव
कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिकोत्सव गुरुवार २४ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे. देश विदेशातील श्री भराडी देवीच्या भक्तांना उत्सुकता असते ते देवीच्या वार्षिकोत्सवाची अर्थात जत्रोत्सवाची.
विविध क्षेत्रातील अनेक महनीय व्यक्ती या जत्रोत्सवास उपस्थिती दर्शवतात व देवीचे आशीर्वाद घेतात. रविवारी सकाळी देवीचा कौल घेऊन देवीच्या हुकमाने सदर तारीख ठरविण्यात आली आहे. एकदा निश्चित झालेली तारीख कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही हे सुद्धा आंगणेवाडी यात्रेचे वैशिष्ट्य आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेला यात्रोत्सव केवळ आंगणे कुटुंबियांसाठी मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता.
देश विदेशात असलेले देवीचे लाखो भक्त या एका दिवसासाठी आंगणेवाडीत येऊन देवीचे दर्शन घेतात. परंतु कोरोना महामारीमुळे या सर्व भक्तांना श्री भराडी मातेचे दर्शन घेता आले नव्हते. यावर्षी देवीच्या सर्व भाविकांना आंगणेवाडीत उपस्थित राहून देवीचे दर्शन घेता येणार असल्याची माहिती आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी दिली आहे.