मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (08:54 IST)

तब्बल ७९५ बालके कुपोषित आढळून आली असून त्यापैकी तीव्र कुपोषित बालके मृत्यूशी झुंज

malnutrition
शहापूर तालुक्याला कुपोषणाने पोखरून काढले असून शासनाच्या दुर्लक्षित पणामुळे कुपोषणाचा विळखा घट्ट बसत चालला आहे. कुपोषणाने थैमान घातलेल्या तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये गेल्या महिन्यात तब्बल ७९५ बालके कुपोषित आढळून आली असून त्यापैकी तीव्र कुपोषित असलेली ८५ बालके मृत्यूशी झुंज देत आहेत तर गेल्या महिन्याभरात सात बालकांचा मृत्यू झाला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
 
शहापूर तालुक्यात मिनी अंगणवाड्यांसह  ७२९ अंगणवाड्या असून त्यामध्ये ३० हजार ४१७ बालके आहेत. यात दर महिन्याला ० ते ६ वयोगटातील मुलांचे अंगणवाडी सेविकांमार्फत वजन घेतले जाते. वजन कमी असल्यास या बालकांची मध्यम कुपोषित आणि तीव्र कुपोषित अशी वर्गवारी केली जाते. कुपोषित बालकांसाठी तसेच गरोदर व स्तनदा मातांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध आहार योजनांचा बोजवारा उडाला असून शेती हंगामाव्यतिरिक्त रोजगारासाठी भटकंती करावी लागत असल्याने कुपोषण फोफावत चालले आहे. विद्यमान सरकार मात्र याकडे डोळेझाक करीत असल्याने कुपोषणाची तीव्रता वाढत चालली आहे. तालुक्यातील शहापूर व डोळखांब प्रकल्पांतर्गत ७१० मध्यम कुपोषित तर ८५ बालके तीव्र कुपोषित असून गेल्या महिन्यात विविध आजाराने ग्रासलेल्या सात बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद शासनदरबारी आहे.