मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (16:01 IST)

भीमा-कोरोगाव हिंसाचार प्रकरणाचे आरोपी वरवरा राव यांना नियमित जामीन, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

suprime court
सुप्रीम कोर्टाने वरवरा राव यांना नियमित जामीन मिळाला आहे. त्यांचं वय आणि आजारपण लक्षात घेता त्यांना सशर्त जामीन मिळाला आहे. न्या. उमेश लळीत यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. भीमा-कोरोगाव हिंसाचार प्रकरणात आरोपी असलेले 82 वर्षीय वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन वाढवला होता. वरवरा राव यांचा जामीन 10 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आला होता.
 
12 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत त्यांना 19 जुलै पर्यंत जामीन देण्यात आला होता. आज पुन्हा सुनावणी झाली त्यात त्यांना 10 ऑगस्टपर्यंत जामीन देण्यात आला आहे. वैद्यकीय कारणांसाठी त्यांना जामीन मंजूर झाला होता. वैद्यकीय कारणांमुळे त्यांना जामिन देण्यात आला आहे.
 
12 तारखेला झालेल्या सुनावणीत राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून ही केस लढणारे सॉलीसीटर जनरल तुषार मेहता यांनीही जामीन वाढवण्याला विरोध केला नव्हता.
 
वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी वैद्यकीय उपचारासाठी दिलेल्या जामिनाची मुदत मंगळवार (12 जुलै) संपणार होती. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनचा कालावधी वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस रवींद्र भट्ट, न्यायाधीश सुधांशू धुलीया आणि न्यायाधीश ललित यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत हा जामीन मंजूर करण्यात आला.
 
वरवरा राव यांच्याकडून वैद्यकीय कारणास्तव कायमस्वरुपी जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल करण्यात होती.
 
कोण आहेत वरवरा राव?
वरवरा हे रिवॉल्यूशनरी रायटर्स असोसिएशनशी संलग्न आहेत. वरवरा यांना हैदराबाद इथं अटक करण्यात आली आणि त्यांना पुण्याला आणण्यात आलं होतं.
 
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, नागरी हक्कांसाठी काम करणारे गौतम नवलखा, सामाजिक कार्यकर्ते अरुण परेरा, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते व्हर्नोन गोन्सालव्हिस यांनाही अटक करण्यात आली होती. या सगळ्यांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला, असा त्यांच्यावर आरोप आहे. वरवरा यांनी त्यांना आर्थिक मदत पुरवली, असा त्यांच्यावर आरोप आहे.
 
पुण्यातल्या विश्रामबाग पोलीस स्थानकात वरवरा यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या 153 (ए), 505 (1) (B), 117, 120 (B) आणि बेकायदेशीर घडामोडी रोखण्यासाठीची कलमं 13, 16, 17, 18(B), 20, 38, 39, 40 गुन्हे दाखल करण्यात आलेत.
 
भीमा कोरेगाव प्रकरणात हिंसा भडकवणारे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यापासून लक्ष दूर हटावं यासाठी पोलीस कपोकल्पित आरोप लावत आहेत, असं वरवरा यांनी तेव्हा बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.
 
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या मुद्यावरून वरवरा यांना याआधीही अटक करण्यात आली होती. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांना फसवण्याचं हे षडयंत्र असल्याचं डाव्या विचारसरणीच्या लोकांनी म्हटलं होतं.
 
वरवरा यांच्या पत्नी हेमलता यांनी गेल्या वर्षी भारताच्या सर्वोच्च न्यायाधीशांना एक पत्र लिहून त्यांच्या सुटकेची मागणी केली होती.
 
वरवरा यांना पुण्यातल्या येरवडा येथील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. अटक झाल्यानंतर वर्षभरानंतरही खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली नव्हती.