मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (18:14 IST)

शिंदे-फडणवीस सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार, सकाळी 11 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी

shinde fadnais
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचा उद्या (9 ऑगस्ट) मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार आहे. 9 ऑगस्ट रोजी 11 वाजता सकाळी राजभवनवर हा नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
 
एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या राज्य सरकारला महिना लोटला तरी अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाहीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे राज्याचा गाडा हाकत आहेत.
 
मंत्रिमंडळ विस्ताराला होणारा उशीर लक्षात घेऊन, विरोधकांकडून शिंदे-फडणवीसांवर टीकाही सुरू झाली होती. अखेर या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडल्याची चर्चा आहे.
 
एकनाथ शिंदेंनी 39 आमदारांसह शिवसेनेतून बंड केलं आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं. हे सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या जवळपास महिन्याभराहून अधिका काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हाती राज्याचा कारभार आहे.
 
अगदी दोनच दिवसांपूर्वी शिंदे गटाचे प्रवक्ते आणि माजी अर्थराज्यमंत्री दीपक केसरकरांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत म्हटलं होतं की, "येत्या दोन-चार दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. विस्तार थोडा उशिरा झाला तरी चालेल, पण सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवणं गरजेच आहे."
 
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेत बंड
शिवसेनेत सर्वात मोठं बंड एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात झालं.
 
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे 39 आमदार सोबत घेऊन बंड केलं आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचलं.
 
त्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.
 
एकनाथ शिंदे हे फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण एकनाथ शिंदे यांची थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर वर्णी लागल्याने खळबळ उडाली आहे.
 
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अशी जोडी गेल्या महिन्याभर राज्याचा कारभार हाकत आहेत. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाल्यानं शिंदे-फडणवीस जोडीला नवे सहकारी मिळतील आणि पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्त्वात येईल.
 
मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंकडून 399 फाईल्सचा निपटारा
एक जुलै ते अगदी आतापर्यंत म्हणजे आठ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 399 फाईल्सचा निपटारा केला आहे.
 
विशेष म्हणजे, यात नैसर्गिक आपत्ती मधील मदत, गरजूंना मदत, कृषि विभाग, मंत्री मंडळासमोर अनावायचे प्रस्ताव, फाईल्स, विविध नवीन शासकीय नियुक्त्या, सरळ सेवा भरती, वन विभाग, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण अशा विविध विभागाच्या फाईल्सचा यात समावेश आहे.
 
मुख्यमंत्र्यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत विविध विभागाच्या सचिवांना सर्वसामान्यांची तसेच जनहिताची कामे गतिमान रीतीने झाली पाहिजेत, तसेच लोकांची कामे अडणार नाहीत हे पाहण्याचे निर्देश दिले होते.