गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुणे आणि पंढरपूर मार्गावरील काही रेल्वे गाड्या रद्द

मंकि हिल आणि कर्जत दरम्यान दक्षिण पूर्व घाटमाथ्यात सुरू होणार्‍या कामानिमित्त मध्य रेल्वेने पुणे आणि पंढरपूर मार्गावरील काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामामुळे काही गाड्या रद्द होणार असून काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
 
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पनवेल-पुणे-पनवेल (रोज) पॅसेंजर गाडी 16 ते 20 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे. यासह सीएसएमटी-पंढरपूर (त्रि-साप्ताहिक) पॅसेंजर गाडी 16 ते 18 जानेवारीदरम्यान, पंढरपूर-सीएसएमटी (त्रि-साप्ताहिक) पॅसेंजर गाडी 17 ते 19 जानेवारी या काळात बंद ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय आठवड्यातून चार दिवस धावणार्‍या सीएसएमटी-बिजापूर आणि बिजापूर-सीएसएमटी या पॅसेंजर गाड्या 15, 16 व 20 जानेवारीला धावणार नाहीत. शिंर्डी-साईनगर शिर्डी-दौंड ही गाडीही 15 ते 20 जानेवारी धावणार नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
 
दरम्यान, भुसावळ-पुणे-भुसावळ एक्सप्रेस 16 ते 20 जानेवारी या काळात मनमाड-दौंड मार्गे वळवण्यात आली आहे. याउलट सीएसएमटी-कोल्हापूर-सीएसएमटी कोयना एक्सप्रेस 16 ते 20 जानेवारी या काळात मुंबईऐवजी पुण्यापर्यंतच धावेल, तसेच संबंधित गाडी कोल्हापूरसाठी मुंबईऐवजी पुण्याहून सुटेल. तरी प्रवाशांनी गाड्यांच्या वेळापत्रकातील बदलांची माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.