बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2021 (21:20 IST)

पदवीधर निवडणुकीत घोटाळा झाला , पत्रकार परिषद घेऊन मोठा बॉम्बस्फोट करणार : चंद्रकांत पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत ‘पदवीधर’मध्ये महाविकास आघाडीने हेराफेरी केल्याचा गंभीर आरोप करत लवकरच याचा खुलासा करणारी पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली आहे. पदवीधर निवडणुकीत घोळ झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत जे यश मिळालं आहे त्याच पद्धतीचं यश आम्हाला पदवीधर निवडणुकीत मिळालं आहे. दोन दिवसातच माझी पत्रकार परिषद घेत मोठा बॉम्बस्फोट करणार आहे. निवडणुकीत कशाप्रकारे सत्तेचा गैरप्रकार करण्यात आला याचा खुलासा मी पत्रकार परिषदेत करणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
 
चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर निवडणुकीच्या पराभवावर पत्रकार परिषद घेणार असून पदवीधर निवडणुकीत कसा घोटाळा झाला याचा खुलासा करणार असल्याचं घोषित केलं आहे. “मराठावाडा पदवीधरमध्ये पाच हजार मतपत्रीका कोऱ्या निघाल्या. पुणे पदवीधरमध्ये अडिच हजार नावं ही पदवीधर नाहीत. त्यांच्या नावापुढे जो शिक्षणाचा रकाना आहे तिथे ७वी, ८ वी असं लिहिलं होतं. शिवाय, ११ हजार नावं अशी आली आहेत, ती पुन्हा पुन्हा आली आहेत. काही नावं तर सहावेळा आली आहेत. ज्यांची सहा नावं आली आहेत, त्या सहाही नावांनी मतदान झालं आहे. शेवटच्या साठ मिनिटांमध्ये १३७-१३८ असं मतदान झालं आहे. हे ९०० पौकी ३०० बुथवर झालं आहे. मी दोन दिवसांनी जी पत्रकार परिषद घेणार आहे त्यात डेमो दाखवणार आहे. मतदान प्रक्रियेत कितीवेळ लागतो हे दाखवणार आहे. एका मतदाराला तीन मिनिटं लागतात. मग ६० मिनिटांमध्ये १३७ मतदान कसं? एवढी मोठी हेराफेरी झाली आहे. तरीही लोकशाहीमध्ये जो निकाल लागला आहे तो मान्य केला आहे. पण हेराफेरी समोर आल्यानंतर तरी मान्य कराल की भाजपचा पराभव नाही आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.