गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 जानेवारी 2024 (09:48 IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २० जानेवारी रोजी ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ चे होणार उद्घाटन

eknath shinde
राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत मुंबईमध्ये  20 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान ‘मुंबई फेस्टिव्हल 2024’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता  क्रॉस मैदान गार्डन, चर्चगेट येथे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
 
या कार्यक्रमात काळा घोडा फेस्ट‍िवलतर्फे तुषार गुहा यांचा गीत सादरीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. शारदा विद्यालयातर्फे लेझीम सादरीकरण, नृत्यांगना सुप्रिया सेन यांचा ओडिशी नृत्याचा कार्यक्रम, मुंबई फेस्ट‍िवल थीम साँग, मराठी आणि हिंदी काव्यवाचन कार्यक्रमात अभिनेते अनुपम खेर, सचिन खेडेकर यांचा सहभाग असेल. अभिनेत्री सारा अली खान यांचा नृत्याचा कार्यक्रम, धारावी ड्रीम प्रोजेक्ट कार्यक्रम सादरीकरण होणार असून मराठी अभिनेते अमेय वाघ आणि हिंदी अभिनेत्री मिनी माथूर या कार्यक्रमाचे निवेदन करतील. या फेस्टिवलला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पर्यटन विभागाने केले आहे.
 
उद्घाटन सोहळ्याला पर्यटन मंत्री गिरीश महाजन, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, विधानसभेचे अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, मुंबई फेस्ट‍िवल सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा उद्योगपती आनंद महिंद्रा, सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर, सचिन खेडेकर, काला घोडा फेस्टीवलच्या आयोजक ब्रिंदा मिलेर, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, पर्यटन विभागाचे संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी – शर्मा उपस्थिती राहतील.
 
महाएक्स्पोचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार उद्या उद्घाटन
एमएमआरडीए मैदान वांद्रे येथे होणार महाएक्स्पोचे उद्घाटन २० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व जपानच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत होणार आहे. एमएमआरडीए मैदान वांद्रे येथे महा एक्स्पोचे आयोजन केले असून २० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता ‘महा एक्सपो’चे उद्घाटन होईल. ‘महा एक्सपो’ दिनांक २८ जानेवारी २०२४ पर्यंत सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत, तर शनिवार आणि रविवारी दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहील.
 
‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ मध्ये विविध कार्यक्रम
‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ मध्ये विविध उपक्रम होतील. यामध्ये मुंबईतील विविध ठिकाणी १९ ते २१ जानेवारी आणि २६ आणि २८ जानेवारी रोजी ‘शॉपिंग फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. काळा घोडा येथे २० ते २८ जानेवारी रोजी कला महोत्सव होईल. बीच फेस्ट २० जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान असून यामध्ये योगा, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बीच क्लीन अप आणि स्क्रिनिंग असे विविध उपक्रम जुहू चौपाटी येथे सायंकाळी ६ ते ७ या वेळेत होईल. सिनेमा फेस्ट २० ते २४ जानेवारी दरम्यान असून सायंकाळी ७ वाजता पीव्हीआर चित्रपटगृहांमध्ये मुंबईत विविध शोंचे आयोजन केले आहे. टुरिझम कॉनक्लेव्ह २४ जानेवारी रोजी कलिना येथील ग्रॅण्ड हयात येथे आयोजित केले असून सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे टुरिजम कॉनक्लेव्ह सुरू राहील. क्रिकेट क्लिनिक २६ ते २८ जानेवारी दरम्यान सकाळी ७ ते रात्री ९ आणि रात्री १० ते १२ वाजेपर्यंत ठाकूर क्रिकेट मैदान (कांदिवली पूर्व) येथे आयोजित केले आहे.
 
टाटा मुंबई मॅरेथॉनचे २१ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजन केले आहे. टर्बो स्टार्ट फॉरएव्हर प्लॅनेट चॅलेंज २५ जानेवारी रोजी बीएसई फोर्ट येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजता आयोजित केले आहे. पॅरामोटर शो २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत गिरगाव चौपाटी येथे आयोजित केला आहे. म्युझिक फेस्ट १९ ते २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता विविध ठिकाणी आयोजित केले आहे. संगीत महोत्सवाचे महालक्ष्मी रेसकोर्स येथे २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी आयोजन केले आहे. समारोप कार्यक्रम २८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता वांद्रे येथील एमएमआरडीए मैदान येथे आयोजित केला आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी  https://mumbai-festival.com/ या संकेतस्थळावर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

Edited By - Ratnadeep ranshoor