1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (10:04 IST)

तळोजा कारागृहातून सुटल्या सुटल्याच गुंड गजानन मारणेवर गुन्हा

खुनाच्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गुंड गजानन मारणे याची त्याच्या समर्थकांनी कारागृहापासून मोठी मिरवणूक काढली. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाका येथे फटाके वाजवून, बेकायदेशीर जमाव जमवून दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी मारणे व त्याच्या साथीदारांवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एक ड्रोन कॅमेरा जप्त केला आहे.
 
पप्पू गावडे व अमोल बधे खून प्रकरणात मारणे याची निर्दोष मुक्तता झाल्याने सोमवारी (दि.15) सायंकाळी त्याला नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून सोडण्यात आले. त्यानंतर कारागृहाबाहेर गर्दी केलेल्या त्याच्या समर्थकांनी कारागृहापासून घरापर्यंत मारणे याची मिरवणूक काढली. दरम्यान, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल येथे सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या इराद्याने बेकायदेशीर जमाव जमवला. तिथे फटाके वाजवून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. या संपूर्ण प्रकाराचे ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले. याप्रकरणी मारणे व त्याच्या साथीदारांवर कलम 188, 143, 283, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 37 (1) सह 135 फौजदारी कायदा कलम 7 प्रमाणे तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 15 हजार रुपये किमतीचा ड्रोन कॅमेरा जप्त केला आहे.
 
मारणे याला 2014 मध्ये दोन खुनाच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याच्यासह त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोका) कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. सध्या त्याला नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. सोमवारी तो कारागृहातून बाहेर आल्यानंतर सुमारे दीडशे ते दोनशे वाहनांसह तो पुण्यात आला.