शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जुलै 2017 (12:04 IST)

शेतकरी कर्जमाफीची व्याप्ती वाढविली

राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची व्याप्ती वाढविली असून आता २००९ नंतर (३० जून २०१६ पर्यंत) कर्ज घेतलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाही या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  हा निर्णय घेतला. नियमित कर्ज परतफेडीची मुदतही वाढविण्यात आली असून त्यासाठीची शेवटची तारीख आता ३१ जुलै २०१७ असेल.

राज्य शासनाने कर्जमाफीसाठीची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. १ एप्रिल २०१२ नंतर पीक कर्ज किंवा मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या व ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचाच या कर्जमाफी योजनेत समावेश करण्यात आला होता. आज घेतलेल्या निर्णयानुसार मात्र २००९ नंतर कर्ज घेतलेल्या व थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्यांनी जादाची रक्कम भरल्यानंतर त्यांना दीड लाखाची माफी दिली जाणार आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठीची मुदत एक महिन्याने वाढवून ती ३० जूनऐवजी ३१ जुलै २०१७ करण्यात आली आहे. एकरकमी परतफेड योजनेंतर्गत दीड लाखावरील रक्कम भरण्याचा निश्चित कालावधी शासन निर्णयात नमूद नव्हता. अशा शेतकऱ्यांना दीड लाखावरील रक्कम भरण्यास ३१ डिसेंबर २०१७ किंवा ३१ मार्च २०१८ यापैकी एक तारीख निश्चित केली जाणार आहे.