गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 28 जानेवारी 2021 (21:31 IST)

मुख्यमंत्र्यांनी दिला पुरावा, पाहा ‘अ केस फॉर जस्टीस’ लघुपट

साठ वर्षांपूर्वी कारवारमधल्या एका शाळेत इंग्रजी, मराठी, कोंकणीतून अर्थ शिकविणारी शिक्षिका, एनसीसी बटालियनचा जुना मराठी नामफलक, कानडा जिल्ह्याचे ‘विचारी’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र, १९१२ चा कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा मराठी वार्षिक अहवाल, बेळगावमधील १८९० मध्ये बांधलेल्या पुलाचा मराठीतला शीलाफलक अशा प्रकारे कर्नाटकातल्या सीमा भागामधले शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीपासूनच्या मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे पुरावे सलगपणे समोरच्या कृष्णधवल पडद्यावर उलगडत जातात आणि आपण स्तिमित होतो. राज्याच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या माध्यामातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा पुरावा सादर केला आहे.
 
सीमाभागातील वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाने ५० वर्षांपूर्वी तयार केलेला ‘अ केस फॉर जस्टीस’ हा ३५ मिनिटांचा अप्रतिम आणि संग्राह्य लघुपट सर्वांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. पूर्वीच्या रिळांवर चित्रीकरण केलेल्या या चित्रपटाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने डिजिटल स्वरुपात पुनरुज्जीवित केल्याने इतका जुना दस्तऐवज आपण सहजपणे पाहू शकतो. हा लघुपट आपण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://www.youtube.com/watch?v=y_3Pi36ia-c या यूट्यूब वाहिनीवर पाहू शकतो.