बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 सप्टेंबर 2022 (16:05 IST)

बासुंदीत झुरळ टाकून सागर व मधुर स्वीट्सकडून उकळली खंडणी; CCTV मुळे झाली पोलखोल

नाशिक : बासुंदीत झुरळ पडल्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन मिठाई दुकानाच्या संचालकांकडे खंडणी मागण्याचे दोन प्रकार उघडकीस आले आहे.पहिल्या प्रकारात संशयित आरोपीने सागर स्वीट्सचे संचालक दीपक चौधरी व रतन चौधरी यांच्याकडून 1 लाख रुपयांची खंडणी घेतली.
 
याबाबत रतन चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 19 ऑगस्ट रोजी संशयित अजय राठोड हा कॉलेजरोडवरील सागर स्वीट्स मध्ये आला होता. त्यावेळी त्याने दुकानातून बासुंदी घेत त्यामध्ये झुरळ टाकले.
 
बासुंदीत झुरळ असल्याचे भासवत त्याने मालकाकडे हा व्हीडिओ व्हायरल करण्याची व अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करण्याची धमकी दिली. ही तक्रार द्यायची नसेल तर मला एक लाख रुपये द्या, अशी मागणी त्याने केली.नंतर त्याने 20 ऑगस्ट रोजी मालकाला पुन्हा धमकावत सागर स्वीट्सच्या गंगापूररोड शाखेतून 1 लाख रुपयांची रक्कम खंडणी स्वरुपात घेतली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
 
खंडणीचा दुसरा प्रकार गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाईपलाईन रोडवरील मधुर स्वीट्स येथे 7 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान घडला. या ठिकाणी असलेल्या मधुर स्वीट्स मध्ये संशयित अजय ठाकूर याने वरील प्रकारेच बासुंदीत झुरळ टाकले व त्याचे मालक मनिष मेघराज चौधरी यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. चौधरी यांनी खंडणीची रक्कम देण्यास नकार दिल्याने त्याने अन्न व औषध विभागाकडे तक्रार करेल आणि व्हिडिओ व्हायरल करुन तुमची बदनामी करेल अशी धमकी त्यांना दिली.
 
तुम्ही मला दोन लाख रुपये दिल्यास हे प्रकरण मिटवून घेवू व अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करणार नाही, असे त्याने वारंवार फोन करुन सांगितले. दरम्यान त्याने फोन कॉल, व्हॉट्स अ‍ॅप कॉल, मॅसेजेस व व्हिडिओ पाठवून दुकान बंद पाडण्याची धमकी देत 50 हजार रुपयांची खंडणी मागितली.
 
दुकान मालकाने याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अजय ठाकूर याने स्वत:च बासुंदीमध्ये झुरळ टाकल्याचे आढळून आले. हे लक्षात येताच त्यांनी गंगापूर पोलीस ठाणे गाठत अजय ठाकूरविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.