लढा ओमायक्रोन विरुद्ध, नाशिकमध्ये होणार ओमायक्रोनची चाचणी
राज्यात ओमायक्रोनने पाय पसरायला सुरुवात केल्यामुळे नाशिक प्रशासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर ओमायक्रोनची चाचणी आता नाशिकमध्ये करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मनपा तसेच जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी हि माहिती दिली. नाशिक शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून ओमायक्रोनचे सावट देखील नाशिकववर आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील लॅब मध्ये ओमायक्रोनचा अहवाल तपासणीसाठी पाठविला जात आहे. मात्र या आठ दहा दिवसांचा विलंब लागत असल्याने या कालावधीत ओमायक्रोन पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकमध्येच हि चाचणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान ते पुढे म्हणाले कि, आरटीपीसार चाचणीसाठी लागणारे साहित्य घेणार आहोत. यात दोन प्रकारचे किट असून यामध्ये तीन जीनचे किट ६० ते ७० रुपयाला मिळतात. तर चार जीनचे तपासणी किट २५० रुपयांपर्यंत मिळतात. त्याप्रमाणे शहर आणि ग्रामीणमध्ये १० हजार किट घेणार आहोत. या माध्यमातून संशयित रुग्ण आणि परदेशी नागरिक, त्यांच्या संपर्कातील नागरिक यांची तपासणी चार जीनच्या किट द्वारे होईल. नाशिकमध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांची प्रथम तपासणी करण्यात येणार असून त्याचबरोबर त्यांच्या संपर्कातील नागरिकांचे चाचणी ही एस जीनद्वारे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
काय आहे एस जीन
आरटीपीसीआर टेस्ट करताना दोन प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. एका किटमध्ये तीन जीन ची तपासणी केली जाते. दुसऱ्या किटमध्ये चार जिनची तपासणी केली जाते. दुसरा किटमध्ये चौथा जीन एस जीन असतो. हा जीन जर निगेटिव्ह असला तर ओमायक्रोन असल्याची दाट शक्यता असते. मात्र एस जीन जर पॉझिटिव्ह असला तर ओमायक्रोन असल्याची शक्यता कमी असते.