गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 जून 2021 (09:48 IST)

अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीने दिली पोलिसांत तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसिध्द करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली आहे.
 
यासंदर्भात वाघेरे यांनी पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार भोसरी पोलिस ठाण्यात भाजपचे नगरसेवक राजेंद्र किसनराव लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. प्राधिकरणाची जागा परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी राजेंद्र लांडगे यांना अटक करण्यात आली आहे. परंतु, त्यांच्या अटकेनंतर भाजपच्या वतीने सोशल मिडियावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याविषयी अपप्रचार केला जात आहे. ही बाब गंभीर स्वरुपाची आहे.
 
भाजप नगरसेवक यांच्या विरोधात प्राधिकरणाकडून देण्यात आलेली तक्रार आणि पोलिसांकडून झालेली कारवाई या प्रकरणाशी राष्ट्रवादी काँग्रेसचा किंवा आमचे नेते अजितदादा यांचा कोणताही संबध नाही. ही कारवाई पूर्णपणे प्रशासकीय स्वरुपाची आहे. तरी देखील फसवणुकीसारख्या आर्थिक गुन्ह्याचे समर्थन करत भाजपकडून बदनामी, अपप्रचार सुरू आहे. या पध्दतीने बदनामीकारक मजकूर विविध माध्यमातून भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रसिध्द करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वाघेरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.