गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 जानेवारी 2021 (08:09 IST)

फडणवीस, राज ठाकरे यांच्या सुरक्षाव्यवस्थेत सरकारकडून कपात

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत ठाकरे सरकारने कपात केली आहे. भाजपचे माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, राजकुमार बडोले, शोभा फडणवीस, अंबरिष आत्राम, सुधीर मुनगंटीवार, आमदार राम कदम, प्रसाद लाड, माधव भंडारी, मुंबई काँग्रेस माजी अध्यक्ष कृपा शंकर सिंह यांचे पोलिस संरक्षण काढण्यात आले आहे. 
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मंत्री आशिष शेलार, दीपक केसरकर, माजी राज्यपाल राम नाईक, फडणवीस यांच्या पत्नी अमृता व कन्या दिविजा यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढण्यात आली असून त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढली आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये न्यायालयात सरकारची बाजू मांडनारे वकील उज्ज्वल निकम आणि शुत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ केली आहे.
 
विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निम्बाळकर व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासह विद्यमान मंत्री संदीपान भूमरे, अब्दुल सत्तार, दिलीप वळसे-पाटील व सुनिल केदार यांना पोलिस संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना वाय दर्जाची तर माजी आमदार प्रकाश शेंडगे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा, युवा सेना सचिव वरुण देसाई व राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.