रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 जुलै 2022 (21:17 IST)

राज्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टी, हवामान विभागाचा ईशारा

rain
भारतीय हवामान खात्याने राज्यात पुढील दोन दिवस म्हणजे ८ जुलैपर्यंत अतिवृष्टी होईल असा इशारा दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईत गेल्या २४ तासात मुंबई कुलाबा येथे ८४ मिमी तर सांताक्रूझ येथे १९३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अंधेरी सब वे टिळक नगर टर्मिनस, टेम्बी ब्रिज परिसर तसेच शेख मेस्त्री दर्गा कुर्ला, दादर टीटी याठिकाणी पाणी साचले आहे. मात्र अद्याप सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
 
मध्य रेल्वे वरील वाहतूक धीम्या गतीने सुरु असून पश्चिम रेल्वे मार्ग सुरळीत आहे. मुंबई मध्ये एनडीआरएफच्या ३ टीम या आधीच तैनात आहेत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून २ अतिरिक्त टीम अशा एकूण ५ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
 
कोकण विभागामध्ये पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १००.१ मिमी. पाऊस झाला असून, पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असल्याने आणि भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवीली आहे. पालघर जिल्हा प्रशासन सतर्क असून मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या संपर्कात आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली आहे.
 
ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ९३.९ मिमी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही.तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत असून सकाळी ८ वाजेपर्यंत उल्हास नदीची पातळी १२.९० मीटर एवढी होती जिल्हात सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत.