मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 मे 2021 (21:13 IST)

आता तरी मदत द्या,फडणवीस यांची सरकारकडे मागणी

तौक्ते चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर रायगड दौऱ्यावर आहेत.त्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये जे काही नुकसान झालं आहे, त्याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेतला. यावेळी त्यांनी मागील वर्षी निसर्ग वादळावेळीची मदत मिळाली नाही, आता तरी मदत द्या, अशी मागणी फडणवीस यांनी सरकारकडे केली आहे.
 
“रायगड जिल्ह्यामध्ये जे काही नुकसान झालं आहे, त्याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेतला आहे. जवळजवळ ८ ते १० हजार घरांचं नुकसान झालं असून त्याचं अंतिम मूल्यांकन चालू आहे. फळपीकांचं मोठं नुकसान झालं आहे. साधारणपणे ५ हजार हेक्टरमध्ये फळपीकांचं नुकसान झालं आहे. असा अंदाज आहे. आता पर्यंत जी माहिती आली आहे ती २ हजार हेक्टरपर्यंत आहे. पण ते ५ हजार हेक्टरपर्यंत जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांना वाटतंय,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
 
“विशेषत: तांदूळ, फळपीकांचं नुकसान झालं आहे. यासोबत २०० शाळांचं नुकसान झालं आहे. वैद्यकीय पायाभूत सुविधा असलेल्या २५ इमारतींचं नुकसान झालं आहे. वीज पायाभूत सुविधेचं मोठं नुकसान झालं आहे. जवळजवळ ६०० गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. पुन्हा एकदा वीज पुरवठा सुरळीत करण्याचच काम सुरु आहे. १७२ गावांमध्ये ७० हजार घरं अशी आहेत, ज्यांच्याकडे वीज अजून आलेली नाही, उद्यापपर्यंत वीर पूर्ववत होईल. ३००-४०० पोलचं नुकसान झालं आहे,” असं फडणवीस यांनी सांगितलं.
 
“बोटींचं नुकसान झालं. या सगळ्याचं पंचनामे झाले पाहिजेत. निसर्ग वादळावेळीची मदत मिळाली नाही, आणि आता दुसऱ्यांदा नुकसान होतंय. सर्वसाधरण समोर जे काही दिसतंय त्यावरुन नुकसान भरपाई घोषित करायची असते. निसर्ग चक्रिवादळ आलं तेव्हा घोषणा केल्या ती मदत मिळाली नाही, आता तरी मदत करावी. आता कमी जिल्ह्यांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे सरकारवर जास्त बोझा नाही आहे. त्यामुळे सरकारने भरघोस मदत दिली पाहिजे,” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.