गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (07:40 IST)

खुशखबर, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

mantralaya
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील  शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार, आता प्राथमिक शिक्षकांना १६ हजार रुपये, माध्यमिक शिक्षकांना १८ हजार रुपये आणि उच्च माध्यमिक (कनिष्ठ महाविद्यालय) शिक्षकांना २० हजार रुपये मानधन करण्यात येणार आहे.
 
दरम्यान, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ व्हावी, यासाठी शिक्षक संघटना तसेच शिक्षण सेवक यांच्याकडून वेळोवेळी मागणी केली जात होती. लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा मानधन वाढीचा मुद्दा विधिमंडळात चर्चेला आणला होता. उच्च न्यायालयाने देखील एका निवाड्यात निकाल देताना शिक्षण सेवकांच्या अल्पशा मानधनाविषयी आश्चर्य व्यक्त केले होते. अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
२००० पासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयात नियुक्त शिक्षकांना पहिली तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून मानधन दिले जाते. त्यानंतर त्यांना शिक्षक म्हणून कायम करून शासन नियमानुसार वेतन दिले जाते. पूर्वीच्या मानधनात सप्टेंबर २०११ ला वाढ झाली होती. त्यानुसार सध्या प्राथमिक शिक्षकांना ६ हजार रुपये, माध्यमिक शिक्षकांना ८ हजार रुपये व उच्च माध्यमिक (कनिष्ठ महाविद्यालय) शिक्षकांना ९ हजार रुपये मानधन दिले जात होते. नऊ वर्षांत शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली नव्हती.
Edited by: Ratnadeep Ranshoor