शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2024 (16:10 IST)

लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम, ओबीसींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

Lakshman Hake
facebook
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको या मागणीसाठी बेमुदत उपोषणासाठी बसलेले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे.लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाची सरकारनं दखल घेत त्यांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ पाठवले होते. आमदार गिरीश महाजन, उदय सामंत, गोपीचंद पडळकर आणि अतुल सावे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
 
या भेटीनंतर संध्याकाळी 5 वाजता ओबीसींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
 
या शिष्टमंडळात छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, विजय वडे्टीवार, प्रकाश शेंडगे आणि महादेव जानकर यांचा समावेश असणार आहे. तसंच लक्ष्मण हाकेंच्या 4 समर्थकांचा शिष्टमंडळात समावेश असेल.
 
हाके यांनी मात्र आमरण उपोषण सुरुच ठेवणार असल्याचं म्हटलं आहे.
लक्ष्मण हाके यांचे जालना जिल्ह्यातील वडीगोद्रीमध्ये बेमुदत उपोषण सुरू आहे. वडीगोद्री हे अंतरवाली सराटीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे.
 
शिष्टमंडळ आणि उपोषणकर्ते यांच्यात चर्चेला सुरुवात झाल्यावर शिष्टमंडळाकडून उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांना कागदपत्र देण्यात आले.
यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले, "हाके यांच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक चर्चा केलीय. यातून मार्ग निघायला पाहिजे असं मला वाटतं. आम्हाला हाके यांच्या तब्येतीची काळजी आहे. आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याच्या सोबत चर्चा केली. सरकार तुमच्या पाठीशी आहे."
 
ते पुढे म्हणाले की, "ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. कोणावरही अन्याय होणार नाही. आपण मुंबईला जाऊ, तिथे आपण चर्चा करू. आपल्याला अपेक्षित असलेले उत्तर आपल्याला मिळेल. आपण आपले 5/7 लोक मुंबईला चर्चेला पाठवावेत."
 
दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी सरकारचे शिष्टमंडळ भेटीला आल्याच्या पार्श्वभूमीवर म्हटलंय की, "आम्ही गेले 8/9 दिवस महाराष्ट्र सरकारकडे भूमिका मांडत आलोय. शासन म्हणतंय ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. आंदोलनकर्ते म्हणतात आम्ही आधीच ओबीसी आरक्षणात आहोत."
 
हाके पुढे म्हणाले की, "दोघांपैकी खरं कोण, दोन्ही एकाच वेळी खोटं बोलू शकत नाहीत. ग्रामीण भागातील ओबीसी समाज नाराज आहे. एक दरी या माध्यमातून निर्माण केली जातेय. ठराविक लोकांच्या आंदोलनाला सरकारने रेड कार्पेट घालू नये, आमचा आरोप आहे."
 
ओबीसी आंदोलकांच्या प्रमुख मागण्या-
ओबीसींचं 29 % आरक्षण आहे कायम ठेवावं.
ओबीसी आरक्षणाला हात लागणार नाही, ते लेखी द्यावं.
ज्या 54 लाख बोगस कुणबी नोंदी हाताने खाडाखोड करून तयार करणाऱ्यात आल्यात, ते तात्काळ थांबवावं.
मुख्यमंत्र्यांनी उपोषणस्थळी यावं.
लक्ष्मण हाके बोलत असताना ओबीसी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'एकच पर्व ओबीसी सर्व' घोषणांनी परिसर दणाणला.
 
Published By- Priya Dixit