शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 जुलै 2021 (12:12 IST)

विधिमंडळ अधिवेशन दिवस पहिला : स्वप्नील लोणकरच्या वारसांना 50 लाखांच्या मदतीसाठी विरोधकांचा विधानसभेत जोरदार गदारोळ

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. 5 आणि 6 जुलै म्हणजेचं आज आणि उद्या मुंबईत हे अधिवेशन होत आहे. सर्व कामकाज रद्द करून स्वप्नील लोणकर आत्महत्येप्रकरणी MPSCच्या मुद्द्यावर चर्चा घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 
विरोधकांनी या मुद्द्यावर गदारोळ घातल्यानंतर 31 जुलैपर्यंत MPSCच्या सर्व रिक्त जागा भरू, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. त्यानंतर मात्र विरोधकांनी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. 
 
अधिवेशन सुरू झाल्याझाल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सरकारवर टीका केली. ते म्हणाले, "दोन दिवसात अधिवेशन उरकण्याची घाई सरकार का करत आहे, सरकार काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे? सरकार जे प्रस्ताव मांडणार आहे, त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला वेळ देण्यात यावा."
 
दरम्यान, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या आंदोलनात सहभागी झाले होते.