गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (08:37 IST)

महाराष्ट्र ओमिक्रॉन निर्बंध : लग्न, सार्वजनिक सोहळ्यांत 50 जणांच्या उपस्थितीची अट आणि इतर नियम...

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटनं सर्वांच्या चिंता वाढवल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ पाहायला मिळत आहे.
 
या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं विविध प्रकारची पावलं उचलली जात आहेत. त्यानुसार राज्यात वेगवेगळे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.
 
गुरुवारी (30 डिसेंबर) रात्री राज्य सरकारनं काही नवे निर्बंध लागू केले आहेत. 2021 च्या अखेरच्या दिवसापासून म्हणजे शुक्रवारी 31 डिसेंबरपासून राज्यात हे नवे निर्बंध लागू होणार आहेत.
 
या नव्या निर्बंधांमध्ये प्रामुख्यानं सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळे यांसाठीची उपस्थितीची मर्यादा ठरवण्यात आली आहे. यापूर्वी लागू केलेल्या निर्बंधांसह आता हे नवे निर्बंध कोरोचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आले आहेत.
 
असे आहेत नवे निर्बंध
विवाह सोहळ्यांमध्ये उपस्थितांची संख्या ही 50 एवढी मर्यादीत करण्यात आली आहे. लग्न बंद हॉलमध्ये असेल किंवा खुल्या मैदानात असेल तरीही ही मर्यादा कायम राहणार आहे. यापूर्वी बंदिस्त सभागृहांसाठी ही मर्यादा 100 आणि खुल्या जागेसाठी 250 इतकी होती.
त्याशिवाय इतर कोणतेही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक सोहळे असतील तर त्यासाठीदेखील उपस्थितांच्या संख्येची मर्यादा ही 50 एवढीच मर्यादीत ठेवण्यात आली आहे.
अंत्यसंस्काराच्या सोहळ्यासाठी उपस्थितांच्या संख्येची मर्यादा आणखी कमी करण्यात आली असून अंत्यविधीला केवळ 20 जणांच्या उपस्थितीला परवानगी असणार आहे.
त्याशिवाय इतर ठिकाणांसाठी यापूर्वी जाहीर केलेले निर्बंध कायम राहणार आहेत. ते 25 डिसेंबरपासून लागू झाले आहेत. यामध्ये...
 
संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल.
कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी 25 टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या 25 टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना 27 नोव्हेंबर 2021 चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.
उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 20 टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.
याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.
मुंबईत जमावबंदी
मुंबईतील वाढती रुग्णसंख्या पाहता पोलिसांनी 30 डिसेंबर ते 7 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
 
नवीन वर्षाचे सेलिब्रेशन, पार्ट्या, सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रेशनसाठी एकत्र जमण्यावर पोलिसांनी बंदी घातली आहे. 30 डिसेंबर रात्री 12 वाजेपासून ते 7 डिसेंबर रात्री 12 पर्यंत मुंबईत हे आदेश लागू असतील असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
 
या नियमांचं उल्लंघन झाल्यास महामारी कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
 
याशिवाय राज्यामध्ये विविध ठिकाणी स्थानिक पातळीवर प्रशासनाला आवश्यक वाटत असतील त्यानुसार काही निर्बंध लावता येणार आहेत.
 
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गरज नसताना घराबाहेरग, गर्दीमध्ये जाणं टाळावं अशा सूचना वारंवार प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहेत.
 
31 डिसेंबरसाठी गृहविभागाने जारी केली नियमावली
राज्याच्या गृह विभागानेही कोरोना व्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार खालील सूचना सर्व नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत.
 
नवीन वर्ष शक्यतो घरीच साजरं करा
समुद्र किनारा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी
संध्याकाळी 9 ते सकाळी 6 सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोक नाहीत
गेट-ने ऑेफ इंडिया, मरिन डृाइव्ह, गिरगाव आणि जुहू चौपाटीवर गर्दी करू नये
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रम करू नयेत
फटाक्यांची आतशबाजी करू नये