अनिल देशमुख यांनी ही महत्वपूर्ण घोषणा : पोलिसांसाठी एक लाख घरे बांधणार
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्रातील पोलिसांसाठी एक लाख घरे बांधली जाणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली. नागपूरमध्ये पोलीस महासंचालक शिबीर कार्यालयासह पाचपावली आणि इंदोरा येथील पोलीस अमलदारांचे शासकीय निवासस्थानाचे उद्घाटन केले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली.
राज्यात पोलिसांसाठी घरे कमी आहेत. त्यामुळे ती बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. एखादा बिल्डर आपल्या जागेवर पोलिसांसाठी घर बांधून देत असेल, तर त्याला 4 एफएसआय आणि इतर सुविधा देण्याचा विचार सुरू आहे. ही सर्व घरे पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या नावानेच बांधली जाणार आहेत. जवळपास एक लाख घरे महाराष्ट्र पोलिसांसाठी बांधण्याची तयारी आम्ही केली आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.
कोरोनामुळे राज्य शासनाच्या भरवशावर राहून घरे बांधली जाऊ शकणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरुन पोलीस विभागातूनच घरे बांधली जातील, असेही अनिल देशमुख म्हणाले. येत्या 26 तारखेपासून जेल टुरिझमला सुरुवात होईल. येरवडा जेलसोबत महात्मा गांधींच्या आठवणी आहे. येरवडानंतर इतर जेलमध्ये सुद्धा हे करण्यात येणार आहे. जेल कसे असते याची उत्सुकता नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना असते. त्यामुळे हे सुरु करण्यात येत आहे, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.