शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 जून 2023 (08:40 IST)

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेवर १ जुलै रोजी मोर्चा

Aditya Thackeray
आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेवर १ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चाचा टीझर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे.  मुंबई महापालिकेत रस्ते कामात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्हिडीओत भ्रष्टाचार कसा झाला आणि किती रक्कमेचा झाला याची माहिती दिली आहे.
 
पुढं या व्हिडीओत मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसताना काढण्यात आलेले रस्ता काँक्रिटीकरणासाठी मेगा टेंडर म्हणजे अक्षरशः मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी असल्याचा थेट आरोप ठाकरे गटाकडून राज्य सरकार आणि महानगर पालिकेवर केला आहे. ह्या संदर्भात सविस्तर माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर रिलीज केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेक प्रतिक्रियाही येत आहेत.
 
दरम्यान, आज मुंबईत पावसाला सुरुवात झाली. पहिल्याच पावसात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यावरुन आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
 
शिवसेना भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'एकनाथ शिंदेंना लाज वाटली पाहीजे. नालेसफाईची पाहणी मिंधे गट आणि भाजपने केली होती, पण पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. मुंबईत वेगवेगळ्या रेस्ते कंत्राटांमध्ये घोटाळे झाले आहेत. सत्तेवर गद्दार खोके सरकार आहे. यांनी मोठे घोटाळे केले आहेत, मी अनेक रस्त्यांचे घोटाळे समोर आणले आहेत. सरकारला फक्त कंत्राटदारांची काळजी आहे', असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor