गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (15:19 IST)

अवघ्या 13 वर्षीय मुलीचा विवाह, मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार

बाल विवाह कायद्याने गुन्हा असूनही गावांमध्ये सर्रास लग्न लावले जात आहे. नुकताच एका धक्कादायक प्रकारात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याची घटना नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथे घडली. 
 
याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून पीडितेची आई, मावशी व काका यांचेसह नवरा, सासू-सासरा व आई-वडील यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
नेमकं काय घडलं? 
नेवासा फाटा येथील एका शाळेत शिकणार्‍या मुलीने फिर्याद दिल्याप्रमाणे तिच्या आई, मावशी, काका यांनी 24 मे 2021 रोजी माळीचिंचोरा येथील दुप्पट वयाच्या पुरुषासोबत लग्न लावून दिले. ही बाब तिच्या आजोबांना देखील माहिती नव्हती.
 
लग्नानंतर तिच्यावर वेळोवेळी नवर्‍याने इच्छा नसताना बळजबरीने शरीरसंबध ठेवले. तसेच घरकाम येत नाही म्हणून नवरा, सासू सासरे हे दररोज शिवीगाळ करुन मारहाण करत असत. तसेच मुलीला एका भोंदूबाबाकडे नेण्यात आले व उपचाराच्या नावाखाली मारहाण करण्यात आली नंतर तिला माहेरी पाठवले. 
 
5 सप्टेंबर 2021 रोजी नवर्‍याने मुलीच्या आईला बोलावून तिला बाहेरची बाधा झाली असल्याचे सांगितले आणि घरातून काढून दिले. तेव्हा मुलीला आजोबांच्या घरी खडका ता. नेवासा या ठिकाणी आणले गेले. त्यावेळीही आईने लग्नाची घटना व इतर प्रकार आजोबांना सांगावयाचा नाही असे जोर देवून सांगितले परंतु दोन दिवसापूर्वी मुलीने झालेला प्रकार आजोबांना सांगितला आणि आजोबासोबत जाऊन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
या फिर्यादी वरून नेवासा पोलिसांनी मुलीची आई, मावशी व काकासह पती, सासू व सासरे सह आठजणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.