आॅनलाइन शिक्षणासाठी मोबाइल मिळाला नाही, दहावीच्या मुलीची आत्महत्या
कऱ्हाड तालुक्यातील ओंडमध्ये गरिबीमुळे आॅनलाइन शिक्षणासाठी मोबाइल मिळाला नसल्याने नैराश्यातून दहावीतील मुलीने आत्महत्या केली. साक्षी आबासाहेब पोळ (१५) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. साक्षी ही दहावीत शिक्षण घेत होती. कोरोनामुळे आॅनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. मात्र, हालाखीच्या परिस्थितीमुळे साक्षीच्या आईला मोबाइल घेता आला नाही. त्यामुळे आॅनलाइन शिक्षणासाठी साक्षी मैत्रीणींच्या अथवा शेजाऱ्यांच्या घरी जात होती.
साक्षीने मोबाइलचा हट्ट केल्यानंतर आईला तिच्या शिक्षणाची गरज लक्षात येत होती. मात्र, पैसे आणि काम नसल्याने त्याही हतबल होत्या. दिवाळीपर्यंत पैसे साठवून मोबाईल घेऊ, असे त्यांनी सांगितले होते.
ती लहान असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. घरात आई, लहान भाऊ आणि साक्षी असे तिघेच वास्तव्यास असतात. आई मोलमजुरी करते. कोरोनामुळे आॅनलाइन वर्ग सुरू असल्याने काही दिवसांपासून तिने आईकडे स्मार्ट मोबाईलसाठी हट्ट धरला होता. मात्र, सध्या रोजगारही नसल्याने मोबाइल घेणे शक्य नसल्याचे आईने सांगितले होते.