एमपीएससी परीक्षा पास मात्र नियुक्ती नाही उत्तीर्ण विद्यार्त्यांच्या मतदानावर बहिष्कार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊनही गेल्या पाच वर्षापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या ६२ जणांना केवळ तोंडी आश्वासने देवून बोळवण करण्यात येत आहे. याचा निषेध म्हणून विधानसभेच्या २१ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या मतदानावर सहकुटुंब बहिष्कार घालण्याचा इशारा या एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परिक्षार्थिनी दिला आहे. यामध्ये सोमनाथ पगार, प्रीतम पाठे, शिल्पा सोनवणे, रोमन जनबंधू, गोविंद वाघमारे, राहुल काळे, अमित देव्हारे, किरण मुंगड, दीपक कुमार देशमुख, सिधार्थ लांडगे आदींसह ६२ उमेदवारांचा समावेश आहे.
२०१४ मध्ये हजारो उमेदवारांची परीक्षा होऊन लेखी व तोंडी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ८७ उमेदवारांना अधिव्याख्याता इंग्रजी, शासकीय तंत्रनिकेतन, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट अ पदासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे शिफारस करण्यात आली. त्याप्रमाणे पोलिस व्हेरिफिकेशन साठी अटेस्टेशन फॉर्म देखील भरून घेण्यात आला. यापैकी २३ उमेदवारांना नियुक्ती दिली अन्य ६२ उमेदवारांना मात्र वंचित ठेवण्यात आले. याबाबत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री तसेच विविध अधिकारी यांना भेटूनही न्याय मिळाला नाही. या उमेदवारांनी आझाद मैदानावर ७५ दिवस साखळी उपोषण केले. तरीही न्याय मिळाला नाही. अशी माहिती सोमनाथ पगार यांनी दिली. या सर्व प्रकारामुळे आम्ही उदिग्न झालो. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत.