सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 जानेवारी 2023 (08:40 IST)

पुढील दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील. तसेच मुंबईचे सुशोभीकरण, कोळीवाड्यांचा विकास, चौपाट्या स्वच्छ करण्यावर भर दिला जाईल, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
एबीपी माझाच्या बीकेसी येथे आयोजित ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी उद्याच्या महाराष्ट्राचे त्यांचे व्हिजन मांडले.

मुख्यमंत्री म्हणाले की, हे सरकार मुंबईच्या विकासाला प्राधान्य देऊन काम करत आहे. देशात आणि जगात महाराष्ट्राप्रती एक विश्वास आहे. दाओस येथील आर्थिक फोरममध्ये दीड लाख कोटींपेक्षा जास्त रकमेचे  सामंजस्य करार करण्यात आले, त्यामुळे प्रधानमंत्री यांच्या 5 ट्रिलियन उद्दिष्टपू्र्तीमध्ये महाराष्ट्राची 1 ट्रिलियन उद्दिष्टपूर्ती होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
महाराष्ट्र हे देशातील मोठे औद्योगिक शहर असून येथे मोठ्या प्रमाणात थेट गुंतवणूक होत आहे. निर्यातीत राज्याचा वाटा जास्त असून विकासासाठी नवनवीन चांगले उपक्रम हाती घेण्यात आले आहे. उद्योगांनी राज्यात यावे यासाठी त्यांना जलद गतीने परवानग्या देण्यात येत आहे. उद्योगांना पोषक वातावरण देण्यात येत असून यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.
 
नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गामुळे राज्यात रस्त्यांची जोडणी वाढली असून यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. याचबरोबर पर्यावरणपूरक कॉरिडॉर करत असून यात पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले.
 
राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी राज्यात नवीन वसाहती उभारणे, झोपडपट्टी निर्मूलन, फ्लेमिंगो करिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, सौर ऊर्जेद्वारे 400 मे.वॅ. वीजनिर्मिती करणे, शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे यासाठी 18 नवीन प्रकल्प तयार करणे, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी नवीन तंत्रज्ञान आणणे यावर भर देण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.
 
मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले की, आगामी वर्षात आम्ही रोजगार, स्वयंरोजगार यावर भर देणार असून मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. महिला, तरुणी आणि बालकाची मोठ्या प्रमाणात तपासणी करतोय. प्राथमिक आरोग्य केंद्राचे आधुनिकीकरण करण्यावर भर  देण्यात येत आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रावर भर देण्यात येईल. पोलीस वसाहती, महिला सन्मान, विजेवरील वाहने यावरही विशेष भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Edited By- Ratnadeep Ranshoor