मेहुण्यांनी केला दाजींचा खून, मोबाईलवरून उलगडले खुनाचे कोडे
लातूर अहमदपूर जवळ झालेल्या एका खुनाचा तपास पोलिसांनी शिताफीने लावला. या खुनातील दोन्ही आरोपींना जेरबंद करुन न्यायालयात उभे केले असता सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. दोन्ही आरोपी मयताचे साडू असून खुनामागचे कारण तपासले जात आहे. घटनास्थळी सापडलेल्या आरोपीच्या मोबाईलमुळे हा तपास सुलभ झाल्याचे पोलिस निरीक्षक सुनील पुजारी यांनी सांगितले.
अहमदपूर अंबाजोगाई मार्गावरील काजळहिप्परगा गावाजवळील कुरबंदा पुलाजवळ एका इसमाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सपोनि जाधव, पोलिस कॉन्स्टेबल सांगवीकर, बेंबडे, माने, श्रीरामे घटनास्थळी दाखल झाले. डोक्याला जबर दुखापत झाल्याने ही व्यक्ती मरण पावल्याचे लक्षात आले. घटनास्थळी एक मोबाईल सापडला. यावरुन ही व्यक्ती व्यंकट जगदाळे असल्याचे समजले. त्याच्या पत्नीला पाचारण केले असता त्यांनीही हा आपलाच पती असल्याचे सांगितले. मेहुणे बालाजी कोपनबईने व समाधान बद्दे यांच्यावर या महिलेने संशय घेतला, तशी तक्रारही दाखल केली. यानुसार पोलिस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी तपासाची चक्रे फिरवली. समाधान बद्दे याला बार्शी परिसरातून तर बालाजी कोपनबईनेला कल्याण डोंबिवली परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.