गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (15:55 IST)

नारायण राणे पोलिसांनी ताब्यात घेतलं, काय घडल्या घडामोडी?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गोळवलीमधून नारायण राणे यांना रत्नागिरी पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.
 
स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाबाबत राणे यांनी केलेलं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं.
 
मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून नारायण राणेंनी केलेल्या विधानावरुन नाशिक शहराचे शिवसेना शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नाशिकमध्ये नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. .
 
महाड, नाशिक नंतर पुण्यात नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
आम्ही रत्नागिरी पोलिसांना विनंती केली आहे की त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना अटक करावी आणि आमच्या ताब्यात द्यावं, असं नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सांगितलं.
 
"आमच्यावर कोणताही दबाव नाही. आम्ही फक्त कायद्याचं पालन करतो. घटनात्मक पदावर बसलेल्या एका व्यक्तीने दुसऱ्या एका व्यक्तीविरोधात तक्रार केली आणि आम्ही त्यावर कारवाई करतोय," असं ते पुढे म्हणाले.
 
दरम्यान रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे .नाशिक मधल्या केससाठी रत्नागिरीत जामिनासाठी अर्ज का, असा सवाल विचारत कोर्टानं हा अर्ज फेटाळला आहे. तांत्रिक मुद्द्यावर हा अर्ज फेटाळण्यात आला.
 
परिणामी नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. पण हायकोर्टानं त्यांच्या जामीन अर्जावर तातडीच्या सुनावणीस नकार दिला आहे. या जीमन अर्जावर तातडीने सुनावणी का गरजेची आहे याची माहिती द्या, असा सवाल कोर्टानं राणेंच्या वकिलांना केला आहे.
 
वक्तव्याचं समर्थन नाही पण पक्ष राणेंच्या पाठीशी-फडणवीस
"मुख्यमंत्र्यासंदर्भात बोलताना संयम बाळगणं आवश्यक. बोलण्याच्या भरात राणे बोलले असतील. भाजप राणेंच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल पण भाजप राणेंबरोबर आहे", असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
"शर्जील उस्मानी राज्यात येतो. भारतमातेला शिव्या देतो, हिंदूंना शिव्या देतो. आक्षेपार्ह भाषेत बोलतो. त्याच्यावर कारवाई करता येत नाही. मात्र अख्खं पोलीस दल राणेंना अटक करण्यासाठी काम करतं. कायद्याच्या भाषेत हा गुन्हा नाही", असं फडणवीस म्हणाले.
 
आमच्या कार्यालयावर चालून आले, तर आम्ही रस्त्यावर येऊन लढणारे लोक आहोत असं ते म्हणाले.
 
"पोलीस दलाचा गैरवापर. निष्पक्ष म्हणून पोलीस दल ख्यातीप्राप्त. परंतु या सरकारच्या काळात महाविकास आघाडीच्या काळात पोलीस दलाचा ऱ्हास झाला आहे. बस म्हटलं की लोटांगण घालत आहे. सरकारला खूश करण्याकरता पोलीस दल कारवाई करत राहिलं तर प्रतिमा खराब होईल."
 
"या सरकारच्या काळात वसूलीकांड झालं. प्रामाणिक अधिकाऱ्यांना फटका बसला. अशा परिस्थितीत पोलिसांचा वापर सरकार करतंय, अलीकडे पोलीसजिवी सरकार. न्यायालयातर्फे चपराक बसते आहे."
 
"लाथा घाला, चौकीदार चोर है म्हणतात. आमच्याविरुद्ध, कुटुंबीयांविरुद्ध बोलतच असता. दुटप्पी भूमिका असू नये. राणेंच्या वक्तव्याप्रकरणी कारवाई अयोग्य आहे," असं ते म्हणाले.