राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना टोला लगावला
शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात निधी वाटपात शिवसेनेला डावललं जात असल्याचा आरोप करत पक्षप्रमुखांकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलं होते. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना टोला लगावला आहे. आपले कपडे जनतेत जाऊन घाटावर धुवायचे नसतात, अशा शब्दात आव्हाडांनी त्यांना टोला लगावला आहे. अंबरनाथ शहरात एका कार्यक्रमानिमित्त आलेले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
श्रीकांत शिंदे यांच्याबाबत जितेंद्र आव्हाड यांना विचारलं असता, "जेव्हा आपण आघाडीच्या सरकारमध्ये असतो, तीन पक्ष मिळून आपण काम करत असतो, तेव्हा शब्दांना मर्यादा घालाव्या लागतात. मी हे मानणारा माणूस आहे की आपण तिघे एकत्र आहोत, त्यामुळे आपले कपडे जनतेत जाऊन घाटावर धुवायचे नसतात, असं म्हणत आव्हाड यांनी शिंदे यांना टोला लगावला आणि सल्लाही दिला. त्यामुळं आता यावर शिवसेनेकडून पुन्हा काय प्रतिक्रिया येते, हे पाहावं लागणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी स्थापन होताना जी त्रिसूत्री ठरली होती, त्यामध्ये निधीचं समान वाटप करण्याचं ठरलं होतं. तसेच, एखाद्या जिल्ह्यात ज्या पक्षाचा पालकमंत्री असेल त्या पक्षाला ६० टक्के आणि अन्य २ पक्षांना २०-२० टक्के निधी देण्याचं ठरलं होतं. मात्र, सातारा जिल्ह्यात हा नियम पाळला जात नसून शिवसेनेला डावललं जात असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला होता. तसेच याबाबत आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही श्रीकांत शिंदे म्हणाले होते. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खासदार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं होतं.