शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (21:17 IST)

नवा वाद, सारथीच्या उद्घाटन पत्रिकेत संभाजी महाराजांना डावलल्याचा आरोप

sambhaji raje
येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सारथी कार्यालयाच्या उद्घाटनावरून नाशिकमध्ये आता नवा वाद निर्माण झाला आहे. सारथीच्या उद्घाटन पत्रिकेत संभाजी महाराजांना डावललं असा आरोप मराठा संघटनांनी केला आहे. संभाजी महाराजांना डावलल्यास कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील विभागीय कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
 
मराठा समाजाच्या विविध मागण्या मंजुर व्हाव्यात यासाठी गेल्या काही वर्षांपासून मराठा छत्रपती संभाजीराजे प्रयत्नशील आहेत. यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर काही दिवस उपोषण देखील केले होते. सारथीचे केंद्र फक्त पुणे येथेच होते. या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका , वसतीगृह आणि इतर प्रशिक्षण दिले जात असते. यासाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांना पुणे येथील सारथीच्या केंद्रात प्रवेश घ्यावा लागत असल्याने विद्यार्थ्यांची मोठी कुचंबना होत असे. त्यामुळे सारथीचे केंद्र नाशिक येथे व्हावे यासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार हेमंत गोडसे पाठपुरावा करत होते. त्यानंतर अखेर हे कार्यालय नाशिकमध्ये उभारण्यात आले आहे. मात्र या कार्यालायाच्या उद्घाटन कार्यक्रमात संभाजी महाराजांना डावलल्याचा आरोप होत आहे.
 
राज्य शासनाने आदेश काढत पंचायत समितीला लागून असलेली जागा सारथीला देण्यासाठी मान्यता दिली होती. जागेला मंजूरी दिल्यानंतर गोडसे यांनी याविषयीची मुळ फाईल मंत्रालयातुन आणत जिल्हा प्रशासनाकडे देत जागा ताब्यात देण्याविषयीची पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या. महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी सदर जागेचा कब्ज़ा सारथीला देण्याचे प्रशासनाला आदेशित केले होते. त्यानुसार नाशिकमध्ये विविध कोर्सेसचे प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका आणि वसतिगृह उभारण्यासाठी शासनाने आदेशानुसार, प्रस्तावित जागेचा ताबा जिल्हा प्रशासनाने छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेला ( सारथी ) दिला होता.  त्या ठिकाणी सारथीचे कार्यालय उभारण्यात आले आहे .