गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (16:17 IST)

पोलिसांसाठी नवीन नियमावली जाहीर, पोलीस कार्यालात ५० टक्के हजर राहण्याच्या सुचना

राज्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने सामान्य नागरिकांप्रमाणे पोलिसांसाठीही नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील पोलिसांना आता पोलीस कार्यालात ५० टक्के हजर राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ही नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीप्रमाणे आता पोलीस कार्यालयात ५० टक्के हजेरी तर उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचं नियोजन करण्यात आले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामात हा बदल करण्यात आला आहे. 
 
यात गट अ आणि ब श्रेणीतील पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती एकूण पदसंख्येच्या 100 टक्के राहील, असं नमूद करण्यात आलं आहे. तर गट क आणि ड श्रेणीतील पोलीस कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती एकूण पदसंख्येच्या 50 टक्के राहील. त्यापैकी 25 टक्के कर्मचारी सकाळी 9 ते 4 या वेळेत कार्यालयात उपस्थित राहतील, तर उर्वरित 25 टक्के कर्मचारी सकाळी 11 ते 5 या कालावधीत कार्यालयात उपस्थित राहतील. कोणत्या कर्मचाऱ्यांनी कोणत्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहायचे आहे, याबाबतचा निर्णय संबंधित उपसहाय्यकांकडे सोपवण्यात आला आहे. यातील गट क आणि गट ड मधील उर्वरित पोलीस कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करणार आहेत. मात्र तात्काळ सेवेसाठी त्यांना फोनवर उपलब्ध राहावे लागणार आहे. तसेच कार्यालयीन कामकाजावेळी कार्यालयात तातडीचे आवश्यकता असल्यास संबंधित पोलीस स्थानकाचे उपसहाय्यक गट क आणि ड श्रेणीतील कर्मचाऱ्यांना बोलवू शकतात. त्यामुळे कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यासाठी आता पोलीस यंत्रणाही पुन्हा सज्ज झाली आहे.