दिलासा नाही, अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. १०० कोटी वसूली प्रकरणात ईडीने अनिल देशमुखांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक केली होती. ते सध्या मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. मात्र आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपणार होती. पण ही कोठडी न्यायालयाने अजून १४ दिवसांपर्यंत वाढवली आहे. अनिल देशमुख गेले 80 दिवसांपासून कोठडीत आहेत.
यापूर्वी त्यांना मुंबईच्या विशेष न्यायालयाने मोठा झटका दिला होता. त्यांची डिफॉल्ट जामीन याचिका विशेष पीएमएलए कोर्टाने मंगळवारी (18 जानेवारी) फेटाळली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटी वसुलीच्या आरोपांवरून न्यायालयाने देशमुख यांना जामीन मंजूर केलेला नाही. डिसेंबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीत बारमालकांकडून बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी १०० कोटी रुपयांची वसूली केली. ही वसूली त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे आणून पोहोचवली. असा ईडीचा आरोप आहे. तसेच हे पैसे अनिल देशमुख यांनी आपल्या व्यवसायात वापरल्याचेही ईडीचे म्हणणे आहे.