पडळकर यांचा ठाकरे सरकारला टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लिहिलेलं पत्र सध्या चर्चेत आहे. या पत्रावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.
सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीचं सरकार अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीयांवर अन्याय करत असल्याचं मी वेळोवेळी लक्षात आणून दिलं. नोकर भरती, शिक्षक भरती, महावितरणमधील भरती अशा विविध भरतीच्या वेळी त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. UPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयही अन्यायकारकच आहे. या समाजातील घटकांना अनेक सोयीसुविधांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना मुद्दाम तुटपुंजा निधी दिला जातोय. या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन सोनिया गांधी यांनीच सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवलं आहे. त्यांच्या पत्राद्वारे मी सरकारवर केलेल्या आरोपांना दुजोराच मिळाला आहे”, असा टोला त्यांनी ठाकरे सरकारला लगावला.
“महाविकास आघाडीतील किमान समान कार्यक्रमाचा सरकारमधील नेत्यांना विसर पडला आहे. अशा परिस्थितीत पक्षश्रेष्ठींनी कान टोचल्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी सत्तेसाठी लाचार न होता सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे. आणि ते जमत नसेल तर या समाजातील जनतेसाठी कामे केली पाहिजेत”, असेही ते म्हणाले.