सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जुलै 2020 (10:55 IST)

खासगी डॉक्टरांनाही मिळणार ५० लाखांचे विमा संरक्षण : एकनाथ शिंदे

राज्य सरकार, जिल्हा प्रशासन आणि महापालिका कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेची निर्मिती करत असताना मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी आयएमएच्या ठाणे शाखेच्या माध्यमातून ५० फिजिशिअन आणि ७ इन्टेन्सिव्हिस्ट सोमवारपासून सेवा देणार असून जनरल प्रॅक्टिशनर्सनीही आपले दवाखाने सुरू केल्यास सरकारी रुग्णालयांवर येणारा ताण कमी होईल. यासाठी त्यांच्यासह महापालिकेच्या कोविड रुग्णालयांमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेऊन त्यांना कोरोनाची बाधा झाल्यास उपचारात काहीही कमी पडू दिले जाणार नाही. तसेच त्यांनाही ५० लाख रुपयांच्या विम्याचे संरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याची ग्वाही राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री यांनी रविवारी दिली.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) ठाणे शाखेच्या माध्यमातून शिंदे यांनी वेबिनारद्वारे आयएमएचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधी आणि एक हजारहून अधिक खासगी डॉक्टरांशी रविवारी संवाद साधला. या वेबिनारमध्ये कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, वर्ल्ड मेडिकल असोसिएशनचे खजिनदार आणि आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकेर, आयएमए, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, राज्य सरकारच्या कोरोना टास्ट फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, ठाण्यातील कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. आनंद भावे, आयएमए, ठाणेचे मावळते अध्यक्ष डॉ. दिनकर देसाई, भावी अध्यक्ष डॉ. संतोष कदम, फोर्टिस रुग्णालयाचे डॉ. राहुल पंडित, ईएनटी तज्ज्ञ डॉ. आशिष भुमकर, डॉ. रीटा भिडे, डॉ. लता घनशामानी, ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा, एमसीएचआयचे ठाणे अध्यक्ष अजय आशर आदी मान्यवरांनी सहभागी होऊन आपली मते मांडली.