गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (08:31 IST)

पाऊस ....पाऊस ....पाऊस

राज्यात पुढील दोन दिवस सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. राज्याच्या काही भागांत १३ सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.दरम्यान, कोकण आणि पश्चिाम महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांत रविवारी पावसाने हजेरी लावली.
 
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे गुजरातच्या परिसरातही कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मोसमी पावसाची आस असलेला हा पट्टा गुजरातपासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढणार आहे. या सर्वांचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे.त्यामुळे १३ सप्टेंबरला राज्याच्या सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे.
 
पश्चिाम किनारपट्टीवर पुढील ३ ते ४ दिवस जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईसह कोकणात मुसळधार ते अति मुसळदार पाऊस पडेल. सोमवारी पालघर, ठाणे, रत्नागिरी येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यांत १४ ते १५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.पुणे,कोल्हापूर,सातारा जिल्ह्यांतील घाट विभागांत १४ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नंदुरबार,नाशिक,जळगाव जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. १३ सप्टेंबरला जालना,परभणी, बीड,हिंगोली,नांदेड जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.या दिवशी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.