मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जानेवारी 2022 (08:14 IST)

दिशाभूल करणारी आयुर्वेदिक औषधे जप्त

अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, मुंबई  येथील गुप्तवार्ता विभागास  दिशाभूल करणारा मजकूर असलेली काही आयुर्वेदिक औषधे नागपूर वर्धा मार्गावरील एका पेढीत विक्रीस उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे औषध  निरीक्षक  (गुप्तवार्ता ) नागपूर व औषध  निरीक्षक, वर्धा यांचे पथकाने  दि. २०/०१/२०२२ रोजी हॉटेल रॉयल फूड, खडकी, जिल्हा, वर्धा या ठिकाणी भेट दिली. या ठिकाणी विविध प्रकारची आयुर्वेदिक औषधे विक्रीसाठी प्रदर्शित करण्यात आली होती.
 
इथे उपलब्ध असलेल्या औषधापैकी काही औषधे जसे  Badal Pain Oil, Diabetes Care Churna , Pachak Methi उत्पादक  मे. मानस आयुर्वेदिक फार्मसी, गाझीयाबाद, उ. प्र.  यावर दिशाभूल करणारा मजकूर तसेच या उत्पादनाबाबत दिशाभूल करणारा मजकूर असलेली जाहिरात प्रदर्शित केली असल्याचे आढळून आले.
 
अशा उत्पादनावर असलेला मजकूर औषधे जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, १९५४, कलम ३ व ४ च्या तरतुदींचे उल्लंघन होत असल्याने उपलब्ध औषध साठा मूल्य रु. १५८००/- पंचनामा करून जप्त करण्यात आला. ही कारवाईत नीरज लोहकरे, औषध निरीक्षक (गुप्तवार्ता) व सतीश चौहान, औषध निरीक्षक, वर्धा यांनी भाग घेतला.
 
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे  आयुक्त परिमल सिंह, व सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.
 
सर्वसामान्य जनतेने दिशाभूल करणारे दावे असणारे औषधे खरेदी करू नये,  डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध उपचार घ्यावा तसेच  औषधे व  सौंदर्य प्रसाधने यांच्या दर्जा बाबत कोणतीही तक्रार असल्यास  अन्न व औषध प्रशासनाच्या संबंधित जिल्हा कार्यालय तसेच टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क  करावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.