शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (11:14 IST)

ज्येष्ठ साहित्यिक एम. जी. भगत भीक मागताना आढळून आले, दै. सामनाच्या बातमीनंतर लागला मुलाचा शोध

begging
दिल्ली येथील ज्येष्ठ साहित्यिक, प्राध्यापक मधुकर गोपाळ भगत पंढरपूर मध्ये भिकारी अवस्थेत आढळून आले. सदरची बातमी दैनिक ‘सामना’च्या ऑनलाइन मधून प्रसिद्ध झाली. त्यानंतर भगत यांच्या मुलाने सामना प्रतिनिधीला संपर्क करुन वडिलांची विचारपूस केली. प्रा. भगत हे गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील राहत्या घरातून बेपत्ता झाले होते. दरम्यान प्रा. भगत यांच्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून संबंधित डॉक्टरांशी चर्चा करुन वडिलांना दिल्लीला घेऊन जाणार असल्याचे प्रा. भगत यांच्या मुलाने प्रतिनिधीला सांगितले. प्रा. भगत यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे.
 
या बाबतचे ह्दयद्रावक वृत्त असे की, बुधवार दि. 9 मार्च रोजी प्रा. भगत हे रेल्वे स्टेशन समोरील भक्ती मार्गावर विपन्न अवस्थेत आढळून आले. त्यांच्या पायाला जखम असल्याने ते वैद्यकीय उपचार करण्यासाठी येण्या जाणाऱ्या लोकांकडे मदत मागत होते. अतिशय वाईट अवस्थेत असल्याने भगत यांच्याकडे कोणी पहात ही नव्हते आणि मदत ही करीत नव्हते. तथापि काही नागरिकांनी ही खबर रॉबिनहुड आर्मी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला दिली. या शाखेत काम करणारे योगेश कुलकर्णी व सुजित दिवाण यांनी तातडीने दखल घेत प्रा. भगत यांना 108 रुग्ण वाहिकेतून सोलापूरला हलविले.
 
ही बातमी दैनिक सामनाने  प्रसिद्ध केली ती राज्यभर व्हायरल झाली. बातमीत ते वर्धा येथील असल्याचा उल्लेख केल्याने पोलिसांकडून चौकशीची चक्रे फिरली. चौकशी अंती हे कुटूंब दिल्लीत राहात असल्याचे समोर आले. दिल्लीतील मुलांकडे संपर्क केला असता त्यांनी वडील एक महिन्यापासून घरातून बेपत्ता झाल्याचे सांगितले. धम्म दीक्षा घेण्यासाठी म्हणून बाहेर पडले त्यानंतर संपर्कच झाला नाही.  सामनाच्या बातमीतून वडील पंढरपूर मध्ये असल्याचे समजले. बातमी वाचून आनंद आणि खूप वाईट वाटले. संबंधित डॉक्टरांशी संपर्क करुन त्यांना पुढील उपचारासाठी दिल्ली किंवा नागपूर येथे हलविणार असल्याचे मुलाने सांगितले.