शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 15 मे 2022 (10:19 IST)

'केतकी चितळेच्या पोस्टमध्ये शरद पवार यांचा उल्लेख आढळत नाही' - तृप्ती देसाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंदर्भात वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अभिनेत्री केतकी चितळेचं समर्थन करणारी भूमिका तृप्ती देसाई यांनी घेतली आहे.
 
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केतकी चितळेच्या पोस्टमध्ये कुठेही शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख आढळत नाही असा दावा केला आहे. या पोस्टमध्ये केवळ 'पवार' असा उल्लेख असल्याचं तृप्ती देसाई यांचं म्हणणं आहे.
 
त्या म्हणाल्या, आपल्याकडे लोकशाही आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. तिच्या पोस्टमध्ये कुठेही पूर्ण नावाचा उल्लेख दिसत नाही. त्यामुळे ती पोस्ट शरद पवार यांच्याबद्दलच आहे का? असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित केला आहे.
 
दरम्यान, केतकीने शरद पवार यांच्याविषयी जाणीवपूर्वक लिहिलं असल्यास ते चुकीचं आहे असंही त्या म्हणाल्या आहेत.
 
केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. सोशल मीडियावरही तिच्यावर टीका करण्यात आली तर पोलीस ताब्यात घेत असताना केतकीवर शाई फेकण्यात आली.
 
केतकीला प्रत्युत्तर देताना आपण किती संस्कारहीन आहोत हे दाखवू नका, असंही तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत. केतकीने चुकीची पोस्ट केली असल्यास तिच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी पण ट्रोलर्सने असभ्य भाषा वपरू नये, असं त्यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान, शरद पवार यांनीा यासंदर्भात प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे. आपण केतकी चितळेला ओळखत नसल्याने तिने काय पोस्ट केली आहे हे सुद्धा माहिती नाही असं म्हणत शरद पवार यांनी यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.