गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 मार्च 2019 (09:14 IST)

लातूरमधून दिला जाणार शिवसेनेचा महिला उमेदवार अशी चर्चा

लातूर शहर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. युती झालेली असल्याने या मतदारसंघातून शिवसेना आपला उमेदवार देणार आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात सेनेच्या वतीने महिलेला उमेदवारी देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले असून शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक सुनीताताई चाळक येथून लढणार असल्याचे वृत्त आहे.
 
लातूर शहर हा सेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. आतापर्यंत शिवसेनेकडून पप्पू कुलकर्णी येथून लढत असत. परंतु काही वर्षापुर्वी कुलकर्णी यानी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यात काही दिवसांपुर्वी राज्य पातळीवर भाजपा आणि शिवसेनेची युती झाली. त्यामुळे लातुरातून शिवसेनेचाच उमेदवार राहणार हे पक्के झाले आहे. 
शिवसेनेकडे अनेक इच्छुक आहेत. असे असले तरी यावेळी लातूर शहरातून महिलेला उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत लातूर शहर मतदारसंघात एकदाही महिलेला उमेदवारी मिळालेली नाही. कोणत्याही राजकीय पक्षाने या मतदारसंघात महिलेला संधी दिलेली नाही. त्यामुळे शिवसेना महिलेला उमेदवारी देण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. अशा स्थितीत सुनीताताई चाळक यांच्याशिवाय इतर कोणतीही महिला लढण्यास पात्र असल्याचे दिसत नाही. चाळक यांनी नगरसेविका, गटनेत्या म्हणून काम पाहिलेले आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. सध्या जिल्हा संघटक म्हणून त्या कार्यरत आहेत. या माध्यमातून त्यांचा चांगला लोकसंपर्क आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवाराला चांगली लढत देण्याची त्यांच्यात क्षमता आहे. या सर्व बाबींचा विचार करता चाळक यांना उमेदवारी द्यावी अशी मागणीही केली जात आहे.
 
मनपाच्या निवडणुकीत चाळक पराभूत झाल्या होत्या. याची आठवण लातुरकरांना आहे. उद्धवसाहेब देतील तो आदेश मानू अशी प्रतिक्रिया चाळक यांनी दिली आहे.