मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 जून 2022 (08:57 IST)

धक्कादायक.. महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवर चाकूने जीवघेणा हल्ला..

murder knief
सांगली : सामान्य नागरिकांवर कधी लुटमारीच्या हेतूने असेल, तर कधी छळ करण्याच्या हेतूने असेल बहुतांश वेळा हल्लेखोरांकडून धारदार शस्त्राने हल्ला झाल्याच्या घटना नेहमी घडत असतात. त्यात महिलांच्या बाबतीत छेडछाड करण्याच्या हेतूने अनेकदा हल्लेखोरांकडून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात येतो. पण हल्लेखोरांनी आता थेट अधिकाऱ्यांना लक्ष केल्याचे दिसत आहे. सांगली (Sangali) येथे एका वर्ग-१ (Class 1) दर्जाच्या महिला अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीत उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेत अज्ञात दोघा हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, छेडछाडीतून हा हल्ल्याचा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, सांगलीच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम (Harshlata Gedam) यांच्यावर बाईकवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांकडून चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेबाबत महिला महसूल अधिकारी गेडाम यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून दोघा अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मुख्य म्हणजे यापूर्वीही त्याच दोघा बाईकस्वारांकडून उपजिल्हाधिकारी गेडाम यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.
उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम या दररोज पहाटे जॉगिंगसाठी (jogging) विश्रामबागच्या राजमती कल्पद्रुम मैदानावर जातात. आज पहाटेही त्या नेहमीप्रमाणे जॉगिंगला गेल्या असताना, दोघा बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी या महिला अधिकाऱ्याची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यावेळी कराटे फायटर असणाऱ्या गेडाम यांनी या हल्लेखोरांना कराटेच्या टाईपमध्ये अटकाव केला. तसेच त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर दुसऱ्या हल्लेखोराने चाकू काढून गेडाम यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गेडाम यांच्या हातावर जखम झाली आहे. मार्शल आर्ट (marshal art) प्रशिक्षित असणाऱ्या गेडाम यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिहल्ला केल्यानंतर दोन्ही आरोपींनी त्या ठिकाणाहून पळ काढला. या घटनेनंतर गेडाम यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यांमध्ये जाऊन अज्ञातांच्या विरोधात तक्रार दिली. यापूर्वीही गेडाम यांच्यावर अशा प्रकारे छेडछाडीचा प्रकार झाला होता. मात्र, त्यांनी त्यावेळी तक्रार केली नव्हती. आज पुन्हा असाच गंभीर प्रकार घडला. यानुसार पोलिसात गुन्हा दाखल केला असून संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
 
दरम्यान, उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या वर्ग-१ दर्जाच्या अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या या घटनेमुळे सांगलीत खळबळ उडाली आहे.