शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (21:47 IST)

बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक; राज्यात संतापाची लाट

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बेळगावसह जत, अक्कलकोट आदी भागांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यानंतर आज बेळगावजवळ कन्नड संघटनांनी उच्छाद मांडला आहे. कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या 6 ट्रकवर दगडफेक केली आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ट्रकवर झेंडे मिरवत असतांना पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. कन्नड संघटनांच्या या दगडफेकीनंतर कर्नाटक सरकारने कारवाई करावी अशी मागणी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
 
अधिक माहितीनुसार, हिरेबागवाडी टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून ही दगडफेक करण्यात आली आहे. त्याशिवाय, महाराष्ट्राच्या ट्रकला शाईदेखील दावण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे आज बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. त्या पार्श्वभूमीवर आज कन्नड संघटनांचा विरोध आणि मंत्र्यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवण्यासाठी बेळगाव सीमेवर आज मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगाव दौरा रद्द केला. तरीही कन्नड संघटनांनी केलेल्या या कृत्यामुळे आता राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
 
महाराष्ट्राला डिवचण्याचे काम कन्नड रक्षण वेदिकेकडून करण्यात आले आहे. अशाच घटना सुरू राहिल्यास महाराष्ट्रातून देखील त्याला प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटकमधील आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बेळगाव आणि सीमाभागाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून वक्तव्ये करून चिथावणी दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्नाटक सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबाबत बोलतील असेही त्यांनी सांगितले आहे. शंभूराज देसाई यांनी या दगडफेकीच्या घटनेचा निषेध केला आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दौरा पुढे ढकलण्यात आला होता. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी असेही त्यांनी सांगितले आहे. कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांसोबत आपण चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
 
फडणवीसांचा थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन
बेळगावमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला झाल्याने राज्यामधील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकारानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना फोन केला आहे. बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. महाराष्ट्रातून येणार्‍या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असे देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केले आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor