लैंगिक शोषणातून आत्महत्या, वही भरुन सुसाईड नोटमुळे खुलासा
चंद्रपूर शहरातील सेवादल छात्रवासात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून घेत वसतीगृहात आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी आता अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तसेच त्याने वही भरुन सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या प्रकरणी पोलिसांनी 11 सहकारी विद्यार्थी आणि 3 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी सहकारी विद्यार्थी आणि वसतिगृह कर्मचारी त्याचे लैंगिक शोषण करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या एक ते दीड वर्षांपासून त्याचे लैंगिक शोषण आणि मानसिक छळ होत असल्याचे समोर आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
पिडीत विद्यार्थ्याच्या वस्तू तपासल्यानंतर त्याने वही भरुन लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना आढळली आहे. सुमारे 19 पानांची ही नोंदवही पोलिसांनी आता ताब्यात घेतली आहे. या छात्रावासात 93 मुले आणि 30 मुली शिक्षणासाठी वास्तव्याला आहेत.
पिडीत विद्यार्थ्याला नृत्याची आवड होती. त्यामुळे त्याचे सहकारी आणि वसतिगृह कर्मचारी त्याला नपुंसक म्हणून छळ करत. याबाबात त्याने वहीत नमूद केले आहे. मला फॅशन डिझायनर व्हायचे होते. त्यासाठी आपला संघर्ष सुरु होता असेही त्याने या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.