रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 जून 2021 (08:12 IST)

कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्या – उपमुख्यमंत्री

पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात काही घटकांना ठराविक वेळेत व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नागरिकांनीही सर्व दक्षता नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याचेही त्यांनी सांगितले. पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
 
पुणे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसीसची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.
 
कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी सर्वच घटकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,  कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही. पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह ग्रामीण भागात गर्दी वाढू लागल्याचे चित्र दिसते आहे. ही चिंतेची बाब आहे. नागरिकांनी सार्वजनिक समारंभाला गर्दी करू नये, शासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे. गर्दी होणाऱ्या ठिकाणी कारवाईच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांनीही याबाबत अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
 
जिल्ह्यात ऑक्सिजन प्लॅन्टची वेळोवेळी तपासणी करून जिल्हा ऑक्सिजनबाबत स्वंयपूर्ण करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, तसेच कोविड रुग्णालयांनी औषधांचा वापर मार्गदर्शक सूचनेप्रमाणे करावा, कोरोना प्रतिबंधाच्यादृष्टीने अधिकाधिक नागरिकांना लस देण्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून लहान मुलांसाठी पुरेशा वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांकडून आकारणी करण्यात आलेल्या बिलांची तपासणी करुन वाढीव बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.