बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :अहमदनगर , मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (09:18 IST)

...तर पुन्हा उपोषणाला बसणार-अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समांतर आंदोलनाची घोषणा करताना मागील आंदोलन स्थगित करतेवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने आंदोलन करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. शिवाय नव्या कृषी कायद्यांसंबंधी पत्रात काहीही भाष्य केलेले नाही. ‘हे आंदोलन केव्हा, कसे व कोठे केले जाईल, याचा तपशील लवकरच जाहीर करू,’ असे पत्र हजारे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पाठविले आहे.
 
कृषीमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हजारे यांनी म्हटले आहे की, ५ फेब्रुवारी २०१९ रोजी राळेगणसिद्धी येथे तत्कालीन कृषीमंत्री राधामोहन सिंह, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तत्कालीन अन्य मंत्र्यांसोबत शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. त्यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांवर केंद्र सरकारने लेखी आश्वासन दिले होते. केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायतत्ता देणे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करून कृषी मालाचा उत्पादन खर्च व किमती ठरविणे अशा अनेक मुद्यांवर चर्चा झाली होती. या सर्व मुद्यांवर योग्य तो निर्णय घेण्यासाठी उच्चाधिकार समिती नियुक्त करण्यात येईल. ही समिती ३० ऑक्टोबर २०१९ पर्यंत अहवाल सादर करील आणि सरकार त्यावर पुढील कार्यवाही करील, असे आश्वासन आम्हाला देण्यात आले होते. त्यामुळे उपोषण मागे घेतले होते. मात्र, आतापर्यंत त्यावर पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे त्या दिवशी स्थगित करण्यात आलेले उपोषण आता पुन्हा सुरू करण्याचा विचार आहे. हे उपोषण केव्हा व कोठे करायचे हे नक्की झाले की पत्राद्वारे कळविण्यात येईल, असेही हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.