उदयनराजे यांनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे : संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर हल्लाबोल केला. संजय राऊत म्हणाले की, उदयनराजे हे माजी खासदार आहेत. शरद पवार हे जाणते राजे आहेत, त्यांना लोकांनी उपाधी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांवर कुणाची मालकी राहू शकत नाही. उदयनराजे यांनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे”, असा हल्ला राऊतांनी केला. दैनिक लोकमतच्या पुण्यातील पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली.
याआधी शिवसेनेने पक्षाला नाव देण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न विचारताना उदयनराजेंनी शिवसेनेला ठाकरे सेना नाव लावण्याचा सल्ला दिला होता.
ही महाविकास आघाडी आहे की महाशिवआघाडी आहे? कारण उदयनराजे म्हणाले की शिव हा शब्द काढून टाकला, याबाबत तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत म्हणाले, “ते काय बोलतात साताऱ्यात, ते त्यांचा प्रश्न आहे. लोकशाही आहे. शिवाजी महाराजांचं नाव घेताना शिवशाहीही म्हणतो. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते भाजपचे माजी खासदार आहेत. त्या पक्षाचे नेते आहेत. ते विरोधी पक्षाचे नेते आहेत”.